December 13, 2011

"कुठे न्यायची सोय नाहीये तुला !"

घंटेचे टोले झाले.

शाळा सुटली.

वर्गा वर्गा मधून मुलांचे थवे बाहेर पडले.

कोणी रिक्षावाल्या काकांच्या मागे पळाले. कोणी आई बाबांबरोबर सायकल/ स्कूटर वर बसले.

मंदार आणि अभिजित गप्पा मारणा-या आपापल्या आयांच्या मागे पुढे राहत, पाठीवरची दप्तरे उडवत, मस्ती करत घराकडे निघाले.

अभिजित चे घर आधी यायचे. तिथवर आले तरी आयांच्या गप्पा संपेनात. मग अभिजित ची आई म्हणली, "अहो मंदारच्या आई, घरी या ना. चहा घेऊन पुढे जा".

चहाबरोबर शि-याच्या बशा आल्या. थोड्या वेळाने मंदार आईच्या कानाला लगटून लाजाळूपणे काहीतरी कुजबुजू लागला. आईच मग म्हणली, "अरे मोठ्याने बोल ना, असं कानात कानात काय चाललंय ?"

"आई, या शि-याचा रंग असा का आहे" ?

"असा म्हणजे काय ? त्यात केशर घातलंय".

"मग आपण केशर का नाही आणत ? मग आपला पण शिरा चांगला होईल".

आई ला मेल्याहून मेल्यासारखं झालं. "बर, पुढल्या वेळी घालू या" असा तह करून आईने गप्पा आटोपत्याच घेतल्या.

आईने घराची कडी काढली आणि मंदारच्या पाठीत हलकासा धपाटा बसला.

"अवलक्षणी कार्ट्या, घरी शिरा केला की हात लावत नाहीस आणि आता डोहाळे लागलेत नाही का ? मागच्या आठवड्यात श्रीखंड केलं होतं त्यात केशर नाही तर काय रंगपंचमीचा रंग घातला होता का ? तेव्हा श्रीखंड पांढरं का नाहीये म्हणलास ना ?"

"अशीच अब्रू टांगा आमची वेशीवर. मुलांना घरात खायला प्यायला तरी देतात की नाही असं वाटायचं!"

"कुठे न्यायची सोय नाहीये तुला !"


---


पंचवीस वर्षांनंतर


---


आई संध्याकाळची भाजीला बाहेर पडली होती. एकदम "हॅलो काकू" ऐकून आईनं वळून पाहिलं. अभिजित. ओळखायला जरा वेळच लागला !

"अय्या अभिजित नाही का तू, अरे किती बदललायस ! ब-याच दिवसात दिसला नाहीस कुठे ?"

"काकू मी ऑन साईट होतो, गेल्याच वर्षी परत आलो."

"अरे वा, तुमच्या पिढीचं हे एक छान आहे. इतक्या तरूण वयात जग बघून होतंय!"

"मंदार काय म्हणतोय? तो सध्या अमेरिकेला आहे ना? आमचा फ़ेसबुक वर कॉन्टॅक्ट असतो मधून मधून".

"हो, तो याच वर्षी गेलाय तिकडे. आता जरा स्थिर स्थावर झालाय असं म्हणतोय. आमचं काय फोन वर बोलणं होतं आठ पंधरा दिवसांत. एक तर ते दिवस रात्रीचं गणित आणि इंटरनॅशनल कॉल वर जास्त वेळ बोलायचं जिवावर येतं बाई आम्हाला!"

"का बरं ? कॉलिंग कार्ड नाही का वापरत?"

"कॉलिंग कार्डच आहे पण तरी उगाच डॉलर कशाला फोन वर खर्च करायचे!"

"नाही तर मग skype वापरा! घरी कंप्यूटर आहे ना ? ते तर फुकटच पडतं!"

"हो तो तर घेतलाय नवा मागच्याच वर्षी. हे तू काय म्हणलास ते विचारीन त्याला. मंदार म्हणजे तुला माहीतच आहे. एक नंबर चा उधळ्या आहे. असलं काही माहीत नको करून घ्यायला त्याला. विचारते आता !"

अमेरिकेतली शनिवार रात्र पुण्याला फोन करायला सोयीची. दोन्ही कडे निवांतपणा असतो.

ख्याली खुशाली आटोपल्यावर आईने विषय काढला.

"अरे तुझा मित्र अभिजित भेटला होता"

"हो, हो, त्याने पिंग केलं होतं मला आज सकाळी"

"अरे गधड्या, तो काय सांगत होता - ते कॉम्प्युटर वर स्वाईप का काहीतरी असतं त्यातून फुकट बोलता येतं म्हणून! आणि तुला काय डॉलर वर आलेत काय ? घरी तो कॉम्प्युटर घेऊन ठेवलायस महागातला तो काय पूजा करायला ? मी म्हणलंच त्याला, आमच्या मंदार ला असलं काही नको पहायला..."

"आई ... आई ... आई... तुझी आगगाडी थांबव.

एक तर त्या सॉफ्टवेअर चं नाव skype असं आहे. आणि मला ते चांगलं माहीत आहे. पण ते हवा पाण्यावर नाही चालत. त्याला इंटरनेट कनेक्शन लागतं.

तुम्ही घरी चांगलं असलेलं इंटरनेट कनेक्शन काढलंत - कश्श्याला हवं म्हणून. आणि वर अभिजित ला जाऊन सांग मला काही माहीत नसतं म्हणून".

"कुठे न्यायची सोय नाहीये तुला !"

:)

November 23, 2010

गिफ्ट

सकाळी सकाळी चिमणला जरा लवकरच जाग आली. पण अंगाचा उठायला विरोध होता. तडजोड म्हणून त्यानं एक डोळा उघडून पाहिलं. उजाडत होतं.
हं !
त्यानं एक लांबसा सुस्कारा सोडला.
आज काहीतरी स्पेशल आहे नं ? आज वाढदिवस !
म्हणजे तसं फार काही विशेष नाही - त्याचं एक मन त्याला सांगायचं. आपल्या निरर्थक आयुष्यातला जस्ट अनदर डे ! पण चिमणला उगाचच जरा सुखावल्यासारखं वाटलं ! लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस ! सवयीनं त्यानं हात लांबवला, पण बाजूला चिमणी नव्हती ! तो हिरमुसला. थोडा अंदाज घेतल्यावर त्याला स्वयंपाकघरात चाहूल वाटली. पण आतापर्यंत उघड्या असलेल्या डोळ्याने सुद्धा असहकार पुकारल्याने त्याने परत डोक्यावर पांघरूण ओढले.

एकदमच फोनची रिंग वाजल्याने त्याला जाग आली. आई बाबांचा फोन होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. इतके वर्ष एका घरात राहून कधी ’हॅपी बर्थ डे’ म्हणलं नसेल ! वाढदिवस ही गोष्ट या घरासाठी फारच किरकोळ होती. पण आता घरापासून दूर आल्यावर फोन मात्र आठवणीनं केला होता. आज वर्किंग डे असल्याने फोनवर गप्पा जरा आटोपत्या घेतल्या आणि फोन ठेऊन शेवटी आळस झटकून पांघरूण फेकून चिमणची स्वारी उठली.

स्वयंपाकघरात ओट्यावर पसारा मांडून चिमणीची स्वयंपाकाची धांदल चालली होती. "हॅपी बर्थ डे" नं तिनं स्वागत केलं. "मी आज शिरा करतिये, पूजेच्या वेळी नैवेद्य दाखव". चिमणनी खुर्चीत बैठक जमवली आणि पेपर वर नजर टाकली. ऍज यूज्वल, कुठल्याच बातमीनं आनंद व्हायचं काहीच कारण नव्हतं ! तरी पण उपचार म्हणून त्यानं पानं उलटली. मग घरभर नजर फिरवली. तेच घर. नेहमीचं. त्याच खोल्या, त्याच वस्तू, तोच पसारा. त्याच्या वाढदिवसाची या मंडळींना काही वार्ता नव्हती. त्यांना काही स्पेशल वाटत नसावं. त्यालासुद्धा. पण वाटावं, असं वाटत होतं ! खरं तर आपल्याला काय हवंय हे त्याला नीटसं उमगत नव्हतं. But something was amiss ! चहाचे घुटके घेताना त्याला आठवलं - केस कापायला झालेत. म्हणजे तसे बरेच दिवस झालेच होते, पण आज वाढदिवसाच्या दिवशी जरा बरा अवतार असावा असं त्याला वाटलं. मग केस कापायच्या मोहिमेवर स्वारी निघाली. तासाभरात परत येऊन मग ब्रेकफास्ट आणि बाकी आवरून आरामात ऑफिसला निघावं असा त्याच्या डोक्यात प्लॅन झाला.

दिवस रोजच्यासारखा सावकाश उगवत होता. कोप-यावरचा फळवाला दुकान मांडत होता. "येताना घेऊया थोडी फळं" त्यानं ठरवलं. सलूनपाशी पोचल्यावर आत तीन चार गि-हाइकं आधीच येऊन बसलेली दिसली. चिमण्याचा चेहरा त्रासिक झाला. आज सुटीचा दिवस नसताना पण गर्दी कशी ! आत गेल्यावर सेटीवर बसायला जागा नव्हती. एक गृहस्थ आलकट पालकट मांडी घालून पेपर वाचत बसले होते. ते जरा आटोपशीर बसते तर चिमणला बसायला जागा झाली असती. चिमणचे डोके एकदमच आऊट झाले. तसं "जरा सरकून घ्या" म्हणून सांगता आलं असतं. पण प्रश्न बसण्याचा वा उभं राहण्याचा नव्हता. प्रश्न होता ’तत्त्वाचा’. आपल्यामुळे इतरांची गैर सोय होते हे समजत कसं नाही लोकांना ! नो सिविक सेन्स. ’लोकांना चाबकाने मारले पाहिजे’ या त्याच्याच जुन्या मताशी तो परत सहमत झाला. खरंतर ’तत्वाच्या’ प्रश्नांनी आयुष्य उगाचच अवघड बनतं ! पण कळणं आणि वळणं यातला फरक त्यानं एव्हाना स्वीकारला होता. मग ’तुला *** गळवं होतील, बसता पण येणार नाही’ असा सणसणीत शाप त्यानं मनोमन ’मांडी’वाल्याला दिला. दुकानात एक दोघे खोकत होते ! खोकताना रुमाल वगैरे वापरायची आपल्यात पद्धत नाहीये. रेडिओवर आणि टीव्ही वर ’शिंकताना आणि खोकताना रुमाल वापरा’ असं किती वेळा का सांगोत ! आपला बाणा सोडायचा नाही. दुखणी कशी आपुलकीनी सर्वांना वाटली पाहिजेत. चिमण्याचा मूड खराब व्हायला छान सुरुवात झाली होती ! त्यात अजून भर - त्याला लक्षात आलं - सलूनवाले अण्णा आज नाहीयेत. दुसरे ’आप्पा’ पण नाहीयेत. एक नवशिका पो-या - चिमण त्याला ’बावरा’ म्हणायचा - आणि एक अजून वेगळाच माणूस होता. चिमणनं डोक्याला हात लावला. आज कुठून केस कापायची दुर्बुद्धी झाली असं त्याला वाटलं. चिमणला ’बाव-या’ ची दया यायची. त्याच्या हातात कौशल्य नव्हतं. बरेच दिवस सलून मधे राहून त्याला केस कापणं काही जमत नव्हतं. त्यामुळे मालकाचा राग आणि सर्वांची चेष्टा यांचा तो ’सॉफ्ट टार्गेट’ होता. त्याची लोकांनी फिरकी घ्यायला सुरुवात केली की चिमणच्या मनाला यातना व्हायच्या. त्याला काम जमत नसेल तर काढून टाकावं. पण असं रॅगिंग त्याला सहन व्हायचं नाही. सेटीवर तेच पेपर पडले होते. त्यांकडे नजर पण टाकावीशी वाटेना. शून्य नजरेने तो इकडे तिकडे पाहत राहिला. वेल, द डे वॉज स्पॉइल्ट...

शेवटी त्याची पाळी आली आणि तो खुर्चीवर जाऊन बसला. त्या नवख्या माणसाने "बारीक करायची ना" वगैरे विचारून सुरुवात केली. तेवढ्यात त्याला लक्षात आलं - शेजारच्या खुर्चीवरती गेल्या तासाभरापासून कटिंगचे एकच गि-हाईक होते आणि बाव-याला अजून पल्ला नजरेत येत नव्हता ! मग त्यानं चिमणचं डोकं सोडलं, आणि बाव-याला मदत करायला घेतली. हा नवा प्राणी कामात चांगला वाटत होता. त्यानं बाव-याला सांभाळून घेत गि-हाइकाचे ’डोके ठिकाणावर’ आणले आणि मग चिमणकडे मोर्चा फिरवला. चिमणची आठवड्याची दाढी पण वाढली होती. मग त्याच्या डोक्यात विचार आला - जरा फ्रेंच बिअर्ड ट्राय करावी. चिमणी ब-याच दिवसांपासून मागं लागली होती. मग नवीन अवतार धारण करून चिमण घरी पोचला. आता फळं वगैरे घ्यायला वेळ नव्हता.

घराला कुलूप होतं. चिमणी ऑफिसला गेली होती. चिमणला आता कशातच रस वाटेना. टेबलावर डब्याचे पदार्थ बनले होते. आंघोळ पूजा आटोपून, डबा भरून चिमण ऑफिसला निघाला. रोजच्यासारखा.

ऑफिसमधे चिमणनं आपला वाढदिवस कोणाला सांगितला नव्हता. त्याला संकोच वाटायचा. ऑफिसमधे ब-याच लोकांनी ’दाढी’ नोटिस केली आणि कॉंप्लिमेंट्स पण दिल्या! दिवस नेहमीप्रमाणं पुढे सरकत होता. चहा, जेवण, डुलक्या. रोजचंच सगळं. नथिंग स्पेशल. ’बर्थ डे’ च्या ब-याच मेल्स आणि एस.एम.एस. आले होते. तसा लग्नानंतरचा हा त्याचा पहिलाच वाढदिवस. त्यामुळे "आज काय स्पेशल" असं प्रत्येकानं विचारलं होतं ! व्हॉट स्पेशल ? ****. तो "स्पेशल" हा शब्द चिमण्याला छळायला लागला.

मग त्यानं कामात मन रमवलं. संध्याकाळी चहाला सगळे जमले तिथे टीम मधल्या कुणाला तरी कुणकुण लागली ! चिमण्याची ही टीम तशी नवीन. एक वर्षापूर्वीच सुरू झालेली. पण अतिशय घट्ट आणि उत्साही. मग केक बीक आणून जोरात सेलिब्रेशन झालं. चिमण्याच्या ’स्प्लिट’ माईंड मधलं एक हरखलं. "आज काय मग संध्याकाळचा प्लॅन ? आज काय गिफ्ट मिळाली?" सगळ्यांनी गिल्ला केला. चिमण्यानं गुळमुळीत हसून "आहे सरप्राईज !" म्हाणून सांगितलं. काम आटोपलं आणि चिमणा रिक्त मनानं घरी पोचला. कुलूप उघडून घरात आला, पण घरानं त्याचं थंडच स्वागत केलं. चिमणी यायला अवकाश होता. मग चिमण्याने देवळाची वाट धरली. मनाला हमखास शांती देणारी ही जागा. तिथे बराच वेळ बसून, प्रार्थना करून चिमणा घरट्याकडे परतला. या खेपेला त्याला कुलूप उघडायला लागले नाही. चिमणीने हसून दार उघडलं आणि एक सुंदर फुलांचा गुच्छ हातात देत स्वागत केलं. पण उमललेल्या फुलांचा गुच्छ पाहूनही चिमण्याची कळी खुलली नाही. त्याने शोधक नजरेने कुठे गिफ्ट दिसतंय का असा कानोसा घेतला. मग त्याला स्वत:च्या पोरकटपणाचा अजूनच राग आला.

रात्री चिमणा चिमणी जेवायला बाहेर पडले. जेवताना चिमण्याचं मन हरवलं होतं. निरर्थक विषयांवर गप्पा, आजूबाजूच्या टेबलांवरच्या माणसांचं निरीक्षण आणि समोरचं खाणं चिवडणं संपवून दोघं घरी आले. "तुझं काय बिनसलंय आज?" चिमणीनं ब-याच वेळा विचारलं. चिमण्याकडे उत्तर नव्हतं. बट यस, नथिंग वॉज स्पेशल. त्याच्या दोन मनांचे तरी अजून कुठं एकमत होत होतं ! दिवस संपला होता तसाही. दिवा मालवून चिमण्याने बिछान्यावर अंग टाकलं. अजून एक नॉट-सो-स्पेशल दिवस मावळला.

दिवस उगवला. कालचे चोवीस तास एक मळभ बनून चिमण्याच्या मनावर दाटले होते. त्याला उठावंसं वाटेना. त्यानं अनिच्छेने डोळे घट्ट मिटून घेतले. अचानक झुळुक यावी तसा एक विचार त्याच्या मनावर फुंकर मारून गेला. कंग फू पांड्याच्या - ’पो’ - च्या बाबांचा आवाज होता तो - "To make something special, you just have to believe it's special..."

चिमणच्या अंगावर एक छानशी शिरशिरी आली."There is no special ingredient. It's just you".

It's just you...

चिमण्याच्या मनावरचं मळभ क्षणात विरलं.
वाढदिवसाची गिफ्ट - बिलेटेड का होईना - त्याला मिळाली होती.

December 31, 2009

Grow up, Mr Parulekar !

प्रिय वाचकहो,
’राजू परुळेकर’ नामक सद्गृहस्थांनी लिहिलेल्या सचिन तेंडुलकर वरील ’या’ दोन लेखांस प्रत्युत्तर म्हणून हा लेख प्रपंच.

लोकप्रभा मध्ये प्रकाशित झालेले हे लेख येथे वाचा -


http://www.loksatta.com/lokprabha/20091127/alkem.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20091218/alke.htm

लेख लिहिण्या पूर्वी मला काही disclaimers देणे आवश्यक वाटते -

१. मी सचिन तेंडुलकरचा चाहता आहे. त्याची खेळण्याची शैली पाहून मला आनंद होतो. त्याने भारतीय क्रिकेट रसिकांस आनंदाचे आणि अभिमानाचे अनेक क्षण दिले आहेत, त्यासाठी मी सचिन चा ऋणी आहे.

२. मी सचिनला ’देव’ समजत नाही. मानव आणि देव यांत फरक आहे हे मला ठाऊक आहे !

३. मला क्रिकेट विलक्षण आवडते, आणि पुरेशा प्रमाणात समजते. मी या विषयातील तज्ञ मात्र अजिबात नाही.

४. हा लेख लिहिण्यासाठी सचिन वा त्याच्या कोणत्याही चाहत्याने मला कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही ;)

५. मी जरी सचिनचा चाहता असलो तरी माझी सदसद्विवेक बुद्धी ही अधिक महत्वाची असल्याने हा लेख ’आंधळी व्यक्तिपूजा’ अजिबात नाही. किंबहुना या लेखात मी शक्य तेवढे वस्तुस्थितीस प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे.

६. हा लेख म्हणजे सचिन चे गोडवे गाण्याचा कार्यक्रम नसून परुळेकर साहेबांचे जे मुद्दे मला पटले नाहीत तेवढेच खोडण्याचा प्रयत्न आहे.

उद्देश :


लेखाच्या सुरुवातीसच मी माझा इरादा स्पष्ट करू इच्छितो.
श्री परुळेकर यांनी लिहिलेला हा जो ’आचरट’ लेख आहे, त्याच्या line-by-line चिंध्या करणे हा माझा उद्देश आहे.

सचिन - मानवजातीचा तारणहार ?
परुळेकर साहेब म्हणतात - "सर्व माध्यमांनी सचिन च्या वाढदिवशी असा थाट केला होता की जणू सचिन हा मानवजातीचा एकमेव तारणहार आहे". कोणी सांगितले तुम्हाला ’जणू’ प्रकरण ? आता आपण एकेक शब्द पाहू.
"मानवजातीचा तारणहार" - माध्यमांतील कुठल्या वाक्यांनी आपल्याला असे वाटले ? थोडी अधिक माहिती द्या ना ! "तारणहार" कोणाला म्हणतात ठाऊक आहे का ? आपल्या लाडक्या खेळाडूचे कौतुक केले म्हणजे त्याला आपण "तारणहार" समजलो असे तुम्हाला कोणी सांगितले ? तुमच्याच कानात वा स्वप्नात येऊन सांगितले का ?

माध्यमांनी अती कौतुक केले ही झाली ’फॅक्ट’

आणि ’तारणहार’ हे झाले तुमचे ’परसेप्शन’. तुमच्या अकलेचे तारे. पिरिअड.


परुळेकर साहेब, तुमची १९ वर्षांची कारकीर्द झाली, आता तरी ’फॅक्ट’ आणि ’परसेप्शन’ यांत फरक करायला शिका.

पुढचा शब्द - "एकमेव". पुन्हा तेच. सचिन चे एक दिवस कौतुक केले, म्हणजे बाकी सर्वांना दुर्लक्षित केले असा अर्थ होतो का काय ? मग २६/११ ला हुतात्म्यांची आठवण केलेली दिसली का तुमच्या डोळ्यांना ? मग अजूनही "एकमेव" शब्द वापरणार का वरच्या वाक्यात ?

बहुसंख्य जनतेचे तसे मत नसेलही
जर तर. बहुसंख्य जनतेचे काय मत आहे हे तुम्हाला माहीत आहे ? नाही ना, असेल नसेल मधे बोलताय ना, मग कशाला तोंड उघडताय ? ’तुमच्या स्वत:बद्दल’ बोला. ’बहुसंख्य जनते बद्दल’ काडीचा ’स्टॅटिस्टिकल डेटा’ नसताना ’उचलली जीभ’ कशाला ?

नैसर्गिक, कृत्रिम आणि अभिजात
आपल्याला शेत कसणारा शेतकरी पाहून आनंद वाटतो ना ? मग नाचा. तुमच्या आनंदात माझा पण आनंद आहे. प्राजक्ताच्या फुलांचा पडलेला सडा पाहून वा पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहून माझंही मन मोहरतं. पण प्रत्येक गोष्टीतला आनंद निराळा. एका विनोदी लेखकांनी (बहुधा अत्रे, चू भू द्या घ्या), ’पाठ खाजविण्यातला आनंद’ या विषयावर भाष्य केले आहे. तुमचं माहीत नाही, पण मला पाठ खाजत असेल तर त्या वेळेस पाठ खाजवून आनंद मिळतो, शेतकरी पाहून वा मोर पाहून नाही. क्रिकेटचे वेगळे स्थान आहे, मोराचे वेगळे आणि शेतक-याचे वेगळे.

बरं, निसर्ग आवडतो तुम्हाला. निसर्ग चित्रे आवडतात ? का ती कृत्रिम ? मी युरोप नाही पहिलेला. पण मग लोकांनी घेतलेले युरोपाचे फोटो पाहून मला आनंद वाटतो. मग फोटो ग्राफी पण कृत्रिमच ना ?

आणि अभिजात आनंद काय असतो हे ठरवायची घाई करू नका. एखादा अध्यात्मिक वृत्तीचा माणूस, ’ही सगळी माया आहे’ वा ’हे सगळं अशाश्वत आहे’ असं म्हणून तुमच्या ’नैसर्गिक’ आनंदाला कदाचित टाचणी लावेल !

सचिन महान का ?
सचिन ला डोक्यावर घेण्यात तुम्हाला एक समस्या दिसतिये, ती म्हणजे ’क्रिकेट हा विरंगुळा आहे’. लोकांना सचिन का आवडतो मला माहीत नाही. पण मला सचिन का आवडतो यातले एक कारण आहे ते म्हणजे सचिन पाशी जे क्रिकेट कौशल्य आहे त्याचा अंशही मजपाशी नाही. एखादी गोष्ट, जी मला ठीकशी जमत नाही तीच गोष्ट सचिन जर अतिशय लीलया करू शकत असेल तर त्याचे कौतुक नाही वाटणार तर काय वाटणार ? कदाचित काही लोकांना द्वेष वाटू शकेल ;)

ग्लॅडिएटर
आपली ग्लॅडिएटर ची उपमा वाचून हसावे का रडावे हे कळले नाही. त्या खेळात क्रौर्य होते, हत्या होती. त्यांतले बहुसंख्य योध्ये स्वत:च्या इच्छेने नव्हे तर जुलूम जबरदस्तीने मैदानात उतरवले जात. आणि हा खेळ पाहून मिळणारा आनंद - क्रौर्य आणि विकृतीने लिडबिडलेला होता.
तुम्हाला काय म्हणायचंय ? एका माणसाने दुस-याच्या छातीत तलवार भोसकणे आणि फलंदाजाने कव्हर ड्राईव्ह मारणे या सारख्या गोष्टी आहेत ? सिंहाने माणसाला फाडणे आणि यॉर्करने स्टंप उखडणे एक आहेत ?
आणि लोकांकडे भाकरी नाहीये म्हणून लोकांचे लक्ष वळवायला क्रिकेट खेळतात ? ज्यांना पोट भरायला दोन घास नाहीयेत ते स्टेडिअम वर नाहीतर टी व्ही वर क्रिकेट बघतात असं तुम्हाला म्हणायचंय ? एक काम करा, दोन दिवस उपास करा। मग म्हणाल, "ती मॅच गेली खड्ड्यात, मला खायला हवंय!" बघा पटतंय का !

तुम्ही ’गिबन’ वाचलाय ते चांगलं आहे. पण म्हणून ’गिबन ची (नसलेली) शेपटी’ भलतीकडे जाऊन जोडू नका !


बर मी क्रिकेट पाहतो. पण मी सत्ताधीशही नाही, ’सट्टा’धीशही नाही आणि उपाशी पण नाही. मग मी क्रिकेट का पाहतो ? तुमच्या म्हणण्या नुसार जनतेत सत्ताधीश आणि उपाशी एवढेच दोन ’क्लासेस’ आहेत काय ? अहो, हे २००९ साल आहे, आपल्या इकडे लोकशाही आहे असं ऐकिवात आहे आमच्या !

’शरद पवार हे सचिन आणि क्रिकेट मधे रस घेऊन देशाला आणि स्वत:ला जनतेच्या भुके कंगालपणाचा विसर पडायला लावतात"
ROTFL

जमिनीवर गडबडा लोळून हसावसं वाटतंय मला !!

परत, ’फॅक्ट्स’. देशातले किती लोक ’भुके कंगाल’ आहेत (माझ्या माहिती नुसार सुमारे ३५ % लोक खाऊन पिऊन सुखी नाहीत) ? किती लोक क्रिकेट पाहतात ? आणि सगळ्यात महत्वाचं - क्रिकेट बंद केलं समजा, तर ही परिस्थिती बदलणार आहे ? मग क्रिकेट आणि सचिन वर आगपाखड कशाला ?
याचा अर्थ भारतातील गरीब/ भुकेल्या लोकांबाबत मी संवेदनशील नाही असा अजिबात नाही. पण मग भुकेल्या लोकांची पर्वा करताना तुम्हाला फक्त क्रिकेटच कसं दिसतं ?

क्रिकेट, सचिन, मानवता, समाज सेवा आणि ...
सचिन ने मानवजातीचे काय भले केले आहे ?
सचिन मुळे मानवजातीला कोणते वरदान प्राप्त झालंय ?

असं मानून चालू ( Assuming without admitting ) - सचिन ने मानवजातीचे कोणतेही भले केलेले नाही. सचिन मुळे मानवजातीला कोणतेही वरदान मिळाले नाहीये. बर मग ? So what ? म्हणून त्याने जे काही मिळवलं आहे, कौशल्य कमावलं आहे, त्याने क्रीडा रसिकांचे मन रिझवलं आहे, त्याच्या - आणि एका भारतीयाच्या नावावर अनेक विक्रम झाले, त्याची किंमत शून्य होते ? स्वत:चे वडील गेल्यावर सचिन धडपडत इंग्लंडला परतला - विश्वचषकाच्या वेळी - ते काय वैयक्तिक विक्रमांसाठी, का पैशासाठी ?

आपले दोन राष्ट्रपती सुखोईमधे बसले। त्यात कलामसाहेब पण आलेच. (तुम्हाला शास्त्रज्ञांचा फार आदर आहे, म्हणून सांगितले !) त्याने मानवजातीचा कुठला फायदा झाला ? किती रुपये लागले त्या उड्डाणांना माहितेय ना ? मग सचिनच का दिसतो ? :)


सचिन हेमलकसाला नसेल गेला. प्रत्येकाने हेमलकसाला गेलेच पाहिजे का ? पूर्वी राजदरबारात कलाकारांना आश्रय मिळे. तो कशाला ? सवाई गंधर्व च्या मंडपात कधी आला असाल. भीमसेन जोशींना संगीतरसिक कसे मान देतात ते पाहिलंय ? भीमसेन जोशींनी गाणं गायल्याने कोणाचे पोट भरलेले नाहीये. मग त्यांच्या संगीतसाधनेची किंमत शून्य ? त्यांना मिळालेले भारतरत्न गैर ? लक्षात ठेवा, रत्न पाहून पोट भरत नाही. पण रत्न हे रत्न असते. पण त्याची किंमत पारख्यास कळते. गाढवांना गुळाची चव तशीही समजत नाही.


समाजसेवा आणि मनोरंजन यांना स्वत:चे स्थान आहे। मी जेव्हा ऑफिसमधून थकून घरी येतो, तेव्हा मला संगीत ऐकून प्रसन्न वाटते. तेव्हा मी समाजसेवेच्या मूड मधे नसतो. जगात ’समाजसेवा’ एवढीच दखलपात्र गोष्ट आहे असे नाही. तसं तुम्हाला वाटत असेल, तर एक किस्सा सांगतो, तो वाचा -


रामकृष्ण परमहंस भक्तांसह बोलत असतां त्यांनी सांगितले - "तुम्हांला एक गोष्ट विचारतो. जर ईश्वर तुमच्या समोर येऊन दर्शन देईल तर तुम्ही त्याची इच्छा धराल की कित्येक हॉस्पिटलांची इच्छा धराल ? जे इस्पितळं दवाखाने करतील आणि त्यांतच आनंद मानतील तेही चांगले लोक होत, परंतु त्यांचा वर्ग वेगळा. जो शुद्ध भक्त असतो, त्याला ईश्वराखेरीज आणखी काहीही नको असतं". (रामकृष्ण वचनामृत)


बर. आता रामकृष्ण हेमलकसाला गेले नाहीत म्हणून त्यांना पण चावणार का ? :)

इथे प्रत्येक माणूस काही ना काही उद्देशाने जन्मलाय. त्याने त्याला पूर्ण न्याय दिला तरी पुरे.

तुम्ही ज्याला अभिजात समजताय त्याची विरक्तपणे उपेक्षा करणारा माणूसही तुम्हाला भेटेल.

क्रिकेट पाहून मिळणारा आनंद आणि मोर पाहून मिळणारा आनंद निराळा. क्रिकेट मधे थरार आहे, उत्तेजना आहे. परीक्षेत पास झाल्याचा आनंद वेगळा, पगार वाढ मिळाल्याचा वेगळा, मूल झाल्याचा वेगळा, आपल्याला चावणारा डास मारल्याचा वेगळा, गाणं ऐकल्याचा वेगळा आणि आपला देश मॅच जिंकल्याचा वेगळा. पण सगळेच आनंद हवेसे असतात. आपापल्या वृत्तीनुसार.

आपण जेवणाचे ताट घेतो तेव्हा त्यात सगळे गोडच पदार्थ असतात का ? त्यात खारट, तुरट, आंबट, तिखट चवी असतात ना ?
सात्विक आणि आरोग्याला उत्तम खाणं खावं. मान्य. मग मिसळीची तर्री चाखायचीच नाही का ?

वैचारिक दिवाळखोरी
सचिनची पत्नी अंजली मॅच बघताना गणपती कडे बघतात.
बघू देत. तुमचे काय जाते ? आणि लोकांना हा विषय चघळायचाय, त्यात काय जगबुडी झाली ?
मी कॉलेज मधे होतो तेव्हा परीक्षेला जाताना एकच ’लकी शर्ट’ घालायचो. माझा एक लकी स्टेपलर होता. आणि तेंडुलकर ची बायको पण तेच करते हे ऐकून मला मजा वाटली. इथून तिथून लोक सारखेच. विषय संपला. एवढी आगपाखड कशाला ?

परुळेकर साहेब, ’प्रेम’ म्हणजे काय हे माहीतेय का आपल्याला ? आपलं ज्या व्यक्तीवर, वस्तूवर प्रेम बसतं, त्याबद्दल बोलावं, ऐकावं असं काही वाटत ? मी किशोर कुमार चा चाहता आहे, आणि त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी मला ठाऊक आहेत, ज्या किशोर शी घेणं देणं नसलेल्यांना अजिबात महत्वाच्या वाटणार नाहीत, वा त्या महत्त्वाच्या नसतीलही, पण मला ऐकावयास आवडतात. त्याचा लहरी पणा, तर्हेवाईक वर्तन, तो रेकॉर्डिंग च्या वेळी करायचा त्या गमती, एक ना अनेक.
भीमसेन जोशींना कार दुरुस्त करता येते. याचं त्यांच्या चाहत्यांना अप्रूप आहे. "तसे बरेच मेकॅनिक असतात, ते पण कार दुरुस्त करतात. मग भीमसेन नी केली तर त्यात काय एवढं कौतुक ", विचारा ना आता ! मी मागे एकदा सवाई च्या पटांगणात भीमसेन आणि अजून दोन तीन जणांना गाडीपाशी उभे राहून मसाला दाणे खाताना पाहिले होते, आणि ही गोष्ट मी ’भाबड्या कौतुकाने’ ब-याच मित्रांना सांगितली होती. त्या दिवशी त्याच गाडीवर शेकडो लोकांनी दाणे खाले असतील, तसेच भीमसेन नी. Big deal ! नाही ?


मला सांगा, बालकृष्णाच्या लीला लोक का चघळतात ? घरी लोणी चोरलं. मग ? ते कृष्णावर प्रेम केल्याशिवाय समजणार नाही.

तुम्ही ’विचारवंत’ ना, तुम्ही बुद्धीवादाचं तुणतुणं वाजवा. कृष्णाचं केवळ उदाहरण दिलं ! नाहीतर सचिन ला त्याच्या पंक्तीला बसवून देव केलं म्हणून गळा काढाल.

बर आता पुढचा मुद्द. "देव बनवणं" म्हणजे काय ? आपण देव म्हणून ज्याची पूजा करतो, तो असतो पाषाण. त्यात आपण देव पाहतो. जो खरं तर आपण ’पाहिला’च नाहीये कधी. आपली श्रद्धा, प्रेम, भक्ती व्यक्त करायला काहीतरी माध्यम शोधत असतं मानवी मन. त्याला कधी मूर्तिपूजेचं रूप येतं तर कधी व्यक्तिपूजेचं.

तुम्ही मानवजातीचं भलं करणा-या शास्त्रज्ञांचा विषय काढलाय तर पाहू - अणुबॉंब कसा बनला ? प्रयोग शाळेतच ना ? त्यानं मानवाचं काय भलं झालं ? प्लॅस्टिक कुठे बनलं ? कोणी बनवलं ? परुळेकर साहेब, भलं काय आणि बुरं काय, हा ज्ञानी लोकांनी करायचा निर्णय आहे. तुम्हाला विक्रमादित्याच्या सिंहासनावर बसायचंय ?
आणि थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला ’नैसर्गिक आणि अभिजात’ गोष्टींचं प्रेम आलं होतें, त्याचं एकदम काय झालं ?

सचिन, विचारवंत, मराठी, मुंबई आणि ...
महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया.
वाचकांनो, माझी एक नम्र विनंती आहे. सचिन ला त्या मुलाखतीत कोणता प्रश्न विचारला, आणि त्याचे उत्तर त्याने काय दिले हे शोधायचा मी आटोकाट प्रयत्न केला. पण ’मुंबई सर्वांची आहे’ असे सचिन कधी म्हणला ते मी ऐकले वा पाहिले नाही. मला ’हे अचूक’ वाक्य हवे आहे. आपणास माहीत असल्यास कृपया मला सांगा.
मला गूगल आणि यू ट्यूब वर सचिनच्या तोंडी एवढेच वाक्य सापडले -
"Mumbai belongs to India. That is how I look at it. And I am a Maharashtrian and I am extremely proud of that but I am an Indian first" .

पहा : http://www.youtube.com/watch?v=7v6dVxyIJE4

पण तो ’मुंबई सर्वांची’ असे म्हणल्याचे मला सापडले नाही. मला जोपर्यंत स्वत:च्या कानांनी हे ऐकायला मिळत नाही तोवर मी प्रतिक्रिया देणार नाही. कारण परुळेकरांनी ज्या माध्यमांवर एवढे तोंडसुख घेतले आहे, त्याच माध्यमांचे एक अजून महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ’शब्द बदलणे’.

तसंच माझ्या दृष्टीने ’प्रश्न’ही महत्त्वाचा आहे. "अचूक प्रश्न काय विचारला" हे कुठेच कसे सापडले नाही कोण जाणे ! कारण प्रश्न काय विचारला हेच ठाऊक नसेल, तर उत्तर कशाला दिले हे कसे कळणार ! प्रश्न ’हरवला’ असेल तर उत्तराचा निम्म्याहून अधिक अर्थ ’हरवतो’ असे माझे ठाम प्रतिपादन आहे. नाहीतर Life, the Universe and Everything = 42 व्हायचे !

सचिन च्या या वाक्याबद्दल मी सुद्धा विशेष खूष नाहीये. ते एवढ्यासाठीच की, आपण मुंबईकर आहोत, महाराष्ट्रियन आहोत, भारतीय आहोत, यांत क्रम लावायची काय गरज आहे ? हा शुद्ध मूर्खपणा आहे.
मी पुणेकर, मराठी, भारतीय, हिन्दू, परशुरामीय (स. प. महाविद्यालय), COEPian , संगणक अभियंता, असं सगळं एकाच वेळी आहे !! आता यात आधी पुणेकर का आधी मराठी का अजून काय काय, हा काय आचरटपणा आहे ? माणूस एकच आहे ! आणि तो हे सर्व काही मिळून बनला आहे ! नंबर लावायला ही काय एस एस सी बोर्डाची मेरिट लिस्ट आहे का काय !

आत सचिन काय म्हणला ते पाहू - "मुंबई भारताची आहे". याचा अर्थ "मुंबई महाराष्ट्राची नाही" असा कसा होतो ? आत या वाक्यात मुंबईच्या ऐवजी इतर काही शहरे घालूया. "बंगलोर भारताचे आहे/ कोलकाता भारताचे आहे". हे वाक्य विचित्र वाटते का ? मला तरी नाही वाटत.
सचिन जे काही म्हणला, त्याचा अर्थ "कोणीही मुंबईत येऊन मुंबईचे वाटोळे करावे/ मुंबईत मराठी ला तिलांजली द्यावी/ मुंबईतून मराठी लोकांना हद्दपार करावे" यांतला कुठलाच होत नाही. किमानपक्षी मला तरी तसे वाटत नाही.

परुळेकर साहेब म्हणतात तसे सचिन ला आपल्या ’इंटरनॅशनल इमेज’ ची काळजी पडली असती, तर ’मंकी/मां की’ प्रकरण त्याने वेगळ्या प्रकारे हाताळले असते. त्या प्रसंगात सचिन च्या प्रामाणिकपणावर संशय घेतला गेला (ऑस्ट्रेलियन टीमकडून), तरीही तो आपल्या भूमिकेवर ठाम राहिला ते काय ’इंटरनॅशनल इमेज’ साठी ? तुमची जीभ तरी असे आरोप करायला धजते कशी ?

खेळ्या आणि विचारवंत
हा तुमच्या उन्मत्तपणाचा कळस आहे. "सचिन ’खेळ्या’ आहे, ’विचारवंत’ नाही". विचारवंत कोणास म्हणायचे ? विचारवंत कोण आहे आणि कोण नाही हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? तुम्ही विचारवंत आहात का ? जगात ’विचारवंत असणे’ आणि ’विचारवंत नसणे’ हे दोनच वर्ग आहेत का ? मधे कोणीच नसते का ? विचारवंत की पदवी (डिग्री) आहे, का परीक्षा आहे का इमेज आहे ? पुस्तके लिहून माणूस विचारवंत होतो का व्याख्याने देऊन ?
माणसाला जनावरांपासून वेगळी काढणारी गोष्ट म्हणजे ’विचार क्षमता’. ती कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाकडे असते. पण विचारवंत हे काही प्रोफेशन नाही. एक माणूस म्हणून सचिन ला विचारक्षमता आहे, आणि त्याहून म्हणजे, भारताचा नागरिक म्हणून त्याला मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्याने ’मी क्रिकेटर आहे, म्हणून माझे हे मत घ्या’ असे सांगितले नाहीये. लोकांनी ते तसे घेतले तर ती त्यांची चूक आहे.

आपल्याला सचिन साठी ’खेळाडू’ का शब्द न सुचता ’खेळ्या’ हा शब्द कसा सुचला ? तुम्ही कुठल्या विचाराने हा विचित्र, कानावर वार करणारा शब्द वापरलात ते तुम्हीच जाणता. पण सचिन वर टीका करताना पातळी सोडून त्याच्या आवाजावर घसरण्याची गरज नव्हती.

तो मैदानावर बॅटने बोलतो, आणि त्याचा तो आवाज पुरेसा जरब बसवणारा असतो.


"सचिन कर्णधार म्हणुन साफ आपटला" हे वाक्य लिहिताना आपल्या मनात उठणा-या आनंदाच्या ऊर्मी मी समजू शकतो. सचिन कर्णधार म्हणून यशस्वी का झाला नाही याची असंख्य कारणे आहेत, त्याला तो एकटाच जबाबदार नाही आहे. इतर दहा खेळाडू तेव्हा काय करत होते ? मी विजय वा पराजय हा संघाचा मानतो, कर्णधाराचा नव्हे. म्हणूनच, धोनीला कर्णधार म्हणून प्रमाणाबाहेर कौतुक करावयास मला आवडत नाही, टीम मधील इतर खेळाडूंचाही विजयात जबरदस्त वाटा आहे. तसंच, पराजयाचं खापर एकट्या कर्णधाच्या माथी मारणं चुकीचं आहे. याऊपर, सचिन कर्णधार म्हणून पात्र नसेलही. मग ? त्याला ’वैगुण्य’ नाही म्हणत ! तो जगन्मान्य फलंदाज आणि उपयुक्त गोलंदाज आहे. हे पुरेसे नाही ? पण कावळ्यांच्या छिद्रान्वेषी दृष्टीला भलं दिसणार तरी कसं ?


धनी हा धनाचा विश्वस्त
असं कुठल्या ग्रंथी कोणी लिहिले आहे ? मिळवलेल्या धनाचा धनी हा कमाई करणारा असतो. तुम्हाला हवं असेल तर तुमचे पैसे उधळा. हलवायाच्या घरावर तुळशीपत्रे ठेऊ नका ! मग जर धन वाटायचेच असेल, तर मिळवायचेच कशाला ! त्याने मॅच फिक्सिंग करून तर पैसे नाही मिळवलेत ना ? आपण आयकर भरतो. तो भरत नसल्यास चूक आहे. पण आयकर भरणे हे ’समाजाचे देणे चुकविण्याचा प्रयत्न आहे’ असं मला वाटतं. सचिन माझ्यापेक्षा अधिक (बराच ;) आयकर भरतो. त्या बदल्यात त्याला माझ्यापेक्षा अधिक सोयी काय मिळतात ? मी एक्स्प्रेस हायवेने जातो, तो पण. मी मुंबई विमानतळावर जातो, तो पण. मग ? मग तो अधिक आयकर का भरतो ? कारण सचिन आणि मी एकेका गुहेत राहत असतो, तर अम्ही दोघेही कंदमुळे जमवली असती. आम्ही ’समाजात’ राहतो, समाजाला सचिनच्या कलेची कदर आहे म्हणून तो अधिक पैसा कमवतो, आणि कदाचित म्हणूनच तो अधिक आयकर भरतो.

आपण वॉरन बफे चे दिलेले उदाहरण वाचून तर हसू आवरले नाही ! शेअर मार्केट मधे कमवलेला पैसा हा लोकांच्या हातात फिरत असतो. तुम्हाला फायदा होतो, तो दुस-या कोणाच्या खिशातून गेलेल्या पैशातून ! आणि असे - लोकांच्या खिशातून - पैसे कमवून, मग त्यातून फाउंडेशन काढले की तुमच्या सारखे लोक मान डोलावणार !

जे लोक समाज सेवेसाठी पैसा खर्च करतात, ते त्यांचे दातृत्व म्हणून. तो समाजावरचा उपकार आहे. ’ते समाजाचे देणे आहे, ते केवळ विश्वस्त आहेत’ वगैरे म्हणून तुम्ही काय त्यांचा पैसा गृहीत धरताय का काय ? त्यांच्या दानाचा हा धडधडीत अपमान आहे ! एखाद्या माणसाने समाजसेवेसाठी तन-मन-धन खर्चले तर तो मोठा आहेच, पण तसे केले नाही तर त्याला छोटा ठरवण्याचे कारण नाही. सचिन ने त्याचा पैसा खर्च कसा करावा हा त्याचा ’खासगी’ प्रश्न आहे. त्यात नाक न घालणेच उचित.

सचिन ची कार
आपल्या देशात खेळाडूंना काही सवलती वा अलग वागणूक दिली जाते. उदा, अमूक एखाद्या पातळीवर खेळाडू असल्यास गुणांमधे वाढ होते, काही नोक-यांमध्ये खेळाडूंना काही कोटा असतो. जशी ही ’निराळी’ वागणूक देण्याची प्रथा आपणच पाडली आहे, त्यानुसार सचिन ने ’भेट म्हणून’ मिळालेल्या (लक्षात घ्या, विकत घेतलेल्या नाही) गाडीवरील ड्यूटी माफ व्हावी म्हणून प्रयत्न केला असेल.
माझ्या प्रामाणिक मतानुसार सचिन ने हा अनावश्यक वाद निर्माण करण्या ऐवजी नियमानुसार वर्तन केले असते तर त्याने आपल्या वर्तनाने चांगला आदर्श निर्माण केला असता, त्याने तसे करायला हवे होते.
पण या साठी एवढे आकांड तांडव कशाला ? त्याने ड्यूटी माफ करून मागितली, ती त्याला मिळाली नाही, विषय संपला. त्याने कायदा तोडला नाही ना ?

कोका कोला
कोका कोला पिणे जर चुकीचे असेल तर त्याचे उत्पादन बंद करा. ते करायचे नसेल तर तोंड बंद ठेवा, लोकांना निर्णय (चुकीचा वा बरोबर) घेऊ दे. म्हणजे कोका कोला ला उत्पादनास परवानगी द्यायची, लोकांनी ते ढोसायचे, आणि सचिन ने त्याची जाहिरात केली की त्याच्या नावाने खडे फोडायचे ! उत्तम न्याय आहे. बर, मगाशी ’सचिन कर्णधार म्हणून आपटला’ याचे चर्वित चर्वण करताना तुम्हाला गांगुली आठवला. तो नाही का जाहिराती करत ? आता नाही तो आठवला ? आता गोपीचंद सापडला.

म्हणजे काय, तुम्हाला सचिन सर्वगुणसंपन्न हवाय. आता मला सांगा, सचिन कडून देवत्वाची अपेक्षा कोण करतंय? त्याला ’आहे तसे स्वीकारणारे, त्याच्यावर प्रेम परणारे चाहते’, का ’त्याच्यामधे थोडे दोष आहे’ म्हणून ओरडणारे तुम्ही ?

बहुमत
आपण आपल्या पहिल्या लेखात म्हणलंय,
"अर्थात बहुसंख्य जनतेचे मत तसे नसेलही. परंतु हल्ली सवंगतेच्या नाही लागलेली माध्यमं बहुसंख्य जनतेच्या मताला फाट्यावर मारतात".

आणि दुस-या लेखात म्हणलंय,
"... तुकोबाच्या गाथाही बहुमताने बुडवण्यात आल्या होत्या ... तुकोबाने तर म्हणलेलेच आहे, सत्य आणि बहुमताचा काय संबंध?"

आता ही दोन वाक्ये नीट वाचा :) जरा आपल्याच दोन विधानांमधली विसंगती तपासून पाहिली असती तर बरे झाले असते। सचिन च्या डोळ्यांतली कुसळे पहायच्या आधी आपले विचार जरा तपासून पहा.


सचिन च्या बाबतीत जाणवणारी एक गोष्ट म्हणजे, काही लोक, त्याने काय केले आहे याकडे अचूक दुर्लक्ष करून ’त्याने काय केलेले नाही’ एवढेच पाहण्यात धन्यता मानतात. त्या लोकांच्या दु:स्वासी कंपूत जाऊन मिळाल्याबद्दल अभिनंदन ! सचिन ने मराठी माणसाचा गळा कापला आहे की नाही ते तुमचे तुम्ही ठरवा, पण मराठी माणसाविरुद्ध कोत्या मनाने उगाच गरळ ओकून आपण ’मराठी’ आहोत हे मात्र तुम्ही छान सिद्ध केलंय !

शेवटी तिखट शब्दांत आपणास एक अनाहूत सल्ला देतो - "पायरी ओळखून रहा. सूर्यावर थुंकायला गेलात तर तुमचेच हसे होईल".